LIVE TV

महाराष्ट्र राज्यात ७८ वर्षांपासून विक्री होत असलेली संभाजी बिडीच्या कंपनीने अखेर नाव बदलणार असल्याचे सांगितले आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शिवधर्म फाउंडेशन आणि राज्यातील काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे-वाघिरे कंपनीने घेतला आहे. दिपकअण्णा काटे हा कार्यकर्ता या मागणीसाठी उपोषणाला बसला होता.

संभाजी बिडीचे नाव अखेर बदलण्यात येणार आहे. या संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या साबळे-वाघिरे ग्रुप कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही दिवस वेळ लागणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. शिवधर्म फाऊंडेशन, तसेच इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असे साबळे-वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले आहे. 

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव अशा पद्धतीने वापरले  जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडने तसेच शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य शिवप्रेमी जनता यांनी अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातही संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात  आले होते. राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पाहायला मिळाले.या आंदोलनानंतर जनभावनेचा आदर राखून आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हे नाव बदलण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागेल असे साबळे वाघिरे आणि कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर रजिस्टर करणार आहे. कारण हे नवीन नाव आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे आमचा ग्राहकांची साखळी तुटणार नाही. तसेच शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि ६० ते ७० हजार विडी कामगारांच्या प्रपंचावर ही कुऱ्हाड येणार नाही, असे देखील कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. 
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor