आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत। तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत।।
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती। देव देश अन् धर्मासाठी प्राण घेतलं हाती ।
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती।।
ह्या ओळी तंतोतंत जुळतात येसाजी कंक ह्यांच्यासाठी. शिवरायांचे मावळे जीवाची कुर्बानी देत असायचे. ‘आम्ही गेलो तरी शिवराय आमचे कुटुंब सांभाळतील,’ ही शाश्वती मावळ्यांना होती. येसाजी कंक शिवरायांचे अत्यंत शूर सरदार, आज जाणून घेऊ त्यांच्या धाडसाबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्यात स्वामीनिनीष्ठेबद्दल.

शिवाजी महाराजांनी बंगळूर वरून आल्यानंतर सगळ्या परगण्याची माहिती काढली, शिक्षण आणि शस्त्र यांचा अभ्यास चालूच होता. पण स्वराज्य घडवायचे तर हे पुरणार नव्हते. गरज होती जीवाला जीव देणाऱ्या साथीदारांची. जिजाऊंनी शिवरायांना माणसाची पारख करणे शिकवले, अनुभव घेत घेत महाराज माणसांची पारख करू लागले होते. कोण कसा आहे, कोणाचा किती फायदा स्वराज्याला होऊ शकतो हाच विचार महाराज करीत असायचे. त्यांना एक मार्ग मिळाला. गावात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला होता, जो त्या प्राण्यांना मारेल आणि शेपूट दाखवेल त्याला सोन्याचे कडे. असे सांगताच अनेक शूर लोक शिवरायांच्या ओळखीचे झाले. त्यात तान्हाजी, सूर्याजी ही मुलं महाराजांना मित्र म्हणून मिळाली… तसेच लहानपणीचे मित्र म्हणजे येसाजीराव कंक. रायरेश्वराची शपथ शिवरायांनी घेतली तेव्हा देखील येसाजी कंक सोबत होते. अफझलखानाचा वध महाराजांनी केला तेव्हा येसाजी अंगरक्षक बनून गेले होते. तसेच शाहिस्तेखान प्रसंगी देखील येसाजी महाराजांसोबत होते. पण एक घटना जी येसाजींचे नाव अजरामर करते ती म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मोठा खर्च झाला होता पण सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत महाराजांना राज्य करायचे होते. त्याच हेतूने महाराजांनी एक भव्य मोहीम आखली होती.
दक्षिण दिग्विजय...! कुतुबशहा बादशाहने शिवरायांचे पराक्रम ऐकले होते. तीच कीर्ती ऐकून बादशाहने शिवरायांचे जंगी स्वागत केले. स्वतः बादशाह महाराजांना घ्यायला चार गावं पुढे गेला. महाराजांचे आगमन भागानगरीमध्ये झाले होते. भागानगरी म्हणजे आजचा हैद्राबाद प्रांत. अनेक ऐशोआराम आणि संपत्तीमध्ये धुंद झालेली नगरी. तिथे कमी होती ती निष्ठावान लोकांची. अनेक गप्पा झाल्या. शाही भोजन झाले. एकमेकांना नजराणे देण्यात आले आणि कुतुबशहाला महाराजांच्या कमतरतेवर बोट ठेवण्याची इच्छा झाली. सरळ सरळ कसं काही बोलणार म्हणून कुतुबशहाने महाराजांना आपले खेळण्याचे मैदान दाखवले. विविध घोडे, शिपाई, शस्त्र, प्राणी, तोफा, इतकेच नाही तर दक्षिणेतले उन्मत्त आणि भक्कम हत्ती...! गजशाळेकडे येताच कुतुबशहा महाराजांना म्हणाला, “महाराज! ये हाथी हैं, दख्खन की शान! वैसे आपने ऐसे हाथी ज्यादातर देखे नहीं होंगे. आपके स्वराज्य मे ऐसे हाथीयों का क्या काम!" महाराज तसे शितावरून भाताची परीक्षा करणारे होतेच. ते कुतुबशहाला प्रत्युत्तर देऊ शकले असते. पण पाहुणे म्हणून आलो आहोत ह्याचे भान ठेवत महाराजांनी सांगितले. “जी हमारे यहाँ ऐसे हाथी तो नही हैं. पर हाथी की ताकदवाले जांबाज लोग जरूर हैं." हे सर्व ऐकताच कुतुबशहाला काय बोलावे सुचेना, तितक्यात काहीतरी सुचून त्याने महाराजांना एक परवानगी मागितली. ‘तुमच्याकडे हत्ती सारखे मावळे आहेत असे म्हणतात, तर माझा हत्ती आणि तुमचा मावळा, होऊ देत सामना...!’ सर्व लोक आश्चर्यतेने पाहत होते. हत्ती आणि मावळ्याची कशी तुलना. महाराजांना पण आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांनी कुतुबशहालाच एखादा मावळा निवडण्याची आज्ञा केली. कुतुबशहाने देखील निवडून मावळा घेतला, ते होते येसाजीराव कंक. छाती पुढे काढून येसाजी आले.
महाराजांना मुजरा केला आणि आज्ञा मागितली. महाराजांनी इशारा केला, होकार कळताच येसाजी मैदानात उतरले. पिसाळलेला हत्ती सोडण्यात आला. त्या हत्तीला दारू पाजण्यात आली. विशाल दात असणारा तो हत्ती येसाजींच्या दिशेने धावू लागला. येसाजी देखील त्याला हुल देत होते. हत्ती जोरात धावत आला आणि येसाजी बाजूला सरले. हत्तीचा वेग इतका होता की हत्ती पुढे निघून गेला. येसाजींनी परिस्थितीचे आकलन केले आणि शिवरायांचा मंत्र ध्यानी आणला. ‘शत्रूच्या कमजोरीचा फायदा घ्या.’ येसाजींनी हत्तीची शेपूट धरली. हत्ती सैरावैरा पळू लागला. त्याला पटकन मागे फिरता पण येत नव्हते. लाथ मारता येत नव्हती आणि हाच फायदा येसाजींनी घेतला होता. नंतर हत्ती खाली बसला, येसाजींच्या लाथांचा मार खाऊन हत्ती शांत झाला होता. काही वेळ अशीच हुल देत येसाजी पुढे आले, समोर दिसणाऱ्या येसाजींना बघून हत्तीने आपली सोंड आकाशात भिरकावली आणि प्रत्येकाच्या भुवया वर झाल्या. हर हर महादेवच्या गजरात येसाजींनी हत्तीची सोंड हवेतच छाटली होती. मैदानात रक्त सांडले होते लोकांनी पाहिले आणि मावळ्यांनी एकच जयजयकार केला. हर हर महादेव. कुतुबशहाच्या हट्टामुळे एका मुक्या जनावराचा जीव गेला होता पण मराठ्यांच्या बाहूमध्ये हत्तीचे बळ असते हे सर्वांना समजले होते. कुतुबशहाने आपल्या गळ्यातील अनमोल कंठा येसाजी कंक ह्यांना दिला पण तो कंठा साफ नाकारत, ‘आम्ही इनाम आमच्या धन्याचे घेऊ,’ असे स्वाभिमानाने सांगितले.
पुढे हे येसाजींनी संभाजीमहारांजाना देखील मार्गदर्शन केले. १६८३ साली फोंड्याच्या लढाईत येसाजींचा मुलगा कृष्णाजी बांदल याला वीरमरण आले. शिवरायांना स्वराज्याच्या शपथेपासून सोबत करणाऱ्या येसाजींनी वयस्कर झाल्यामुळे पुढे लढणे थांबवले. स्वराज्यासाठीचे त्यांनी दिलेल्या योगदानाचे ऋण फेडण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना २००० होन देऊ केले.
स्वराज्याला येसाजी सारखे कर्तबगार, निष्ठावान, पराक्रमी मावळे मिळाले म्हणून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. येसाजींच्या या स्वामिभक्तीला, स्वराज्यप्रेमाला त्रिवार दंडवत!
टिप्पणी पोस्ट करा